HSC 2026 Geo Question paper and Answers
HSC 2026 Geo Question paper and Answers
HSC मार्च 26 भूगोल प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
March 2026
सूचना :
1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.
3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
4) नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
6 ) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी
प्र. 1) दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. (20)
प्र. 1 a) ‘अ’, ‘ब’ आणि‘क’ स्तंभातील घटकाचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा: (5)
| क्र. | ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
| 1 | नकाशा तयार करणे | दिल्ली | नायजर |
| 2 | प्रशासकीय शहरे | पंपाज | लघुउद्योग |
| 3 | गवताळ प्रदेश | निरीक्षण | भूगोल अभ्यासकाची कौशल्ये |
| 4 | खेळणी | बांगलादेश | न्यूयॉर्क |
| 5 | लोकसंख्या विस्फोट | कागद निर्मिती उद्योग | अर्जेंटिना |
उत्तर –
| क्र. | ‘अ’ | ‘ब’ | ‘क’ |
| 1 | नकाशा तयार करणे | निरीक्षण | भूगोल अभ्यासकाची कौशल्ये |
| 2 | प्रशासकीय शहरे | दिल्ली | न्यूयॉर्क |
| 3 | गवताळ प्रदेश | पंपाज | अर्जेंटिना |
| 4 | खेळणी | कागद निर्मिती उद्योग | लघुउद्योग |
| 5 | लोकसंख्या विस्फोट | बांगलादेश | नायजर |
प्रश्न 1 b) अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा : 5 गुण
1) तृतीयक व्यवसायामध्ये समावेश होतो –
a) मासेमारी
b) साखर उद्योग
c) पशुपालन
d) व्यापार
उत्तर: d) व्यापार
2) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक –
a) हवामान
b) मृदा
c) वाहतूक
d) भूरचना
उत्तर: c) वाहतूक
3) विस्तृत व्यापारी शेतीतील प्रमुख पीक –
a) कॉफी
b) गहू
c) तांदूळ
d) औषधी वनस्पती
उत्तर: b) गहू
4) कार्यात्मक प्रदेश –
a) पुणे महानगर
b) लातूर
c) सातारा
d) अमरावती
उत्तर: a) पुणे महानगर
5) भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) हा खालीलपैकी उद्योग प्रकार आहे –
a) संयुक्त क्षेत्र
b) सहकारी क्षेत्र
c) सार्वजनिक क्षेत्र
d) खाजगी क्षेत्र
उत्तर: c) सार्वजनिक क्षेत्र
प्रश्न 1 c) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा : 5 गुण
1) भांडवल गुंतवणुकीनुसार निम्न उद्योगांचा उतरता क्रम लावा –
a) लघुउद्योग
b) सूक्ष्म उद्योग
c) मोठे उद्योग
d) मध्यम उद्योग
उत्तर: c) मोठे उद्योग, d) मध्यम उद्योग, a) लघुउद्योग, b) सूक्ष्म उद्योग
2) चुकीचा घटक ओळखा
a) संशोधन
b) प्रशिक्षण
c) शिकार
d) अध्यापन
उत्तर: c) शिकार
3) खालील देशांचा स्थानानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा –
a) फ्रान्स
b) भारत
c) जपान
d) संयुक्त संस्थाने (U.S.A.)
उत्तर: d) संयुक्त संस्थाने (U.S.A.), a) फ्रान्स, b) भारत, c) जपान
4) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील ‘नंतरच्या काळात विस्तारणारा’ या टप्प्यातून जाणारा देश ओळखा –
a) जर्मनी
b) स्वीडन
c) कांगो
d) चीन
उत्तर: d) चीन
5) मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती –
a) खोल समुद्र – उष्ण सागरी प्रवाह – वनस्पतींची कमतरता – उष्ण हवामान
b) उथळ समुद्र – उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम – प्लवंकांची वाढ – थंड हवामान
c) भूखंड मंच – प्लवंकांची वाढ – मासेमारीची उत्तम कौशल्ये उष्ण हवामान
d) भूखंड मंच – दंतूर किनारे – प्लवंकांची वाढ – उष्ण हवामान
उत्तर: b) उथळ समुद्र – उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम – प्लवंकांची वाढ – थंड हवामान
प्रश्न 1 d) ‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा : 5 गुण
1) आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे.
उत्तर: बरोबर
2) स्थलांतर हा लोकसंख्या बदलातील घटक नाही.
उत्तर: चूक
3) ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणतात.
उत्तर: बरोबर
4) शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो.
उत्तर: बरोबर
5) उद्योगाच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान असतात.
उत्तर: चूक
प्र. 2) खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही चार) : 12 गुण
1) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
2) हिमालय पर्वतीय प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
3) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
4) लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
5) सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
6) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.
1) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात
उत्तर
i) उद्योगाची स्थान निश्चिती प्रामुख्याने निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर आणि गुणधर्मावर अवलंबून असते
ii) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फणस, कोकम, काजू, नारळ आणि राणमेवा यांसारख्या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते
iii) फळे हा नाशवंत कच्चा माल असल्याने त्यांच्यावर त्वरित प्रक्रिया करणे आणि ती हवाबंद डब्यांत भरणे गरजेचे असते
iv) नाशवंत आणि वजनात घट होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित उद्योग कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळच स्थापन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते
v) स्थानिक फळांवर त्वरित प्रक्रिया करून जास्तीत जास्त उत्पादन आणि नफा मिळवण्याच्या दृष्टीने येथे फळप्रक्रिया उद्योग स्थापित झाले आहेत
2) हिमालय पर्वतीय प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते
उत्तर
i) हिमालयीन प्रदेशात अतिशय उंच पर्वतरांगा, तीव्र उतार, उंच सखल भाग आणि दुर्गम डोंगराळ भूभाग तसेच वनांचा भाग आढळतो जो मानवी वस्तीसाठी अनुकूल नाही
ii) अशा दुर्गम पर्वतीय क्षेत्रात रस्ते आणि लोहमार्गांसारख्या वाहतूक व संदेशवहनाच्या सुविधा विकसित करणे अत्यंत कठीण आणि खर्चिक आहे.
iii) येथील विषम आणि प्रतिकूल हवामानामुळे शेती, उद्योग आणि शहरीकरणाच्या वाढीवर मोठ्या मर्यादा आहेत.
iv) नैसर्गिक अडचणींमुळे येथे पायाभूत सुविधांचा विकास इतर मैदानी प्रदेशांच्या तुलनेत खूपच कमी झाला आहे
v) उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव आणि नैसर्गिक अडथळ्यांमुळे या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते
3) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो
उत्तर
i) कोणत्याही प्रदेशाच्या विकासावर तेथील प्राकृतिक रचना, हवामान आणि मृदा यांसारख्या नैसर्गिक घटकांचा मोठा प्रभाव असतो
ii) सुपीक मृदा आणि अनुकूल हवामान असलेल्या मैदानी प्रदेशात शेतीचा विकास होतो ज्यामुळे उद्योग व व्यवसायांना चालना मिळून विकास होत असतो, तर प्रतिकुल हवामान, प्रतिकुल भूरचनेच्या प्रदेशात या सर्व बाबींना अडथळे निर्माण झालेले असतात.
iii) रस्ते आणि लोहमार्गांच्या विकासासाठी सपाट भूभाग आवश्यक असतो जो डोंगराळ आणि दुर्गम भागात सहज उपलब्ध नसल्याने तेथे वाहतूक सुविधांचा अभाव असतो
iv) उंच पर्वतीय, वाळवंटी किंवा घनदाट अरण्यांच्या प्रदेशात साधनसंपत्तीची कमतरता आणि सुगमतेचा अभाव असल्यामुळे विकासाला अनेक अडथळे येतात
v) वाहतुकीच्या सोयींशिवाय उद्योगधंदे विकसित होऊ शकत नाहीत परिणामी अशा प्रतिकूल प्राकृतिक रचनेच्या प्रदेशांचा विकास मंद राहतो तर अनुकूल परिस्थितीच्या प्रदेशात विकासाला चालना मिळालेली असते
4) लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते
उत्तर
i) साक्षरतेचा थेट संबंध देशातील लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा आणि उपलब्ध शैक्षणिक सुविधांशी असतो
ii) साक्षरतेमुळे लोकांची बौद्धिक आणि व्यावसायिक क्षमता वाढते ज्यामुळे देशात विविध व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात
iii) ज्या देशात रोजगाराचे आणि आधुनिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो
iv) शिक्षण आणि आर्थिक विकासामुळे लोकांचे राहणीमान उंचावते ज्यामुळे स्त्रियांचा दर्जा व सामाजिक स्तरही उंचावतो
v) साक्षरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे देशाचा आर्थिक आणि सामाजिक असा सर्वांगीण विकास साधला जात असल्याने ते विकासाचे प्रमुख लक्षण किंवा दयोतक मानले जाते
5) सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही
उत्तर
i) वस्त्यांच्या कार्यांत वाढ झाल्यास आणि तेथे औद्योगिकीकरण व वाहतूक सुविधा विकसित झाल्यास वस्त्यांची वाढ होत असते
ii) साधारणपणे नागरी वस्तीच्या जवळ असणाऱ्या ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर कालांतराने नागरी वस्तीत होते
iii) मात्र ज्या ग्रामीण वस्त्या नागरी वस्त्यांपासून दूर असतात आणि जेथे वाहतुकीच्या अडचणी असतात अशा वस्त्यांच्या कार्यात वाढ होत नाही
iv) अशा दुर्गम वस्त्यांमध्ये उद्योगांवर आधारित द्वितीय आणि तृतीय व्यवसायांची वाढ होत नसल्याने त्या आपले ग्रामीण स्वरूप टिकवून ठेवतात
v) प्राकृतिक घटक आणि साधनसंपत्तीच्या मर्यादांमुळे अनेक ग्रामीण वस्त्यांच्या वाढीवर मर्यादा येतात म्हणून त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होऊ शकत नाही.
त्यामुळे सर्वच ग्रामिण वस्त्यांचे रुपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
6) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते
उत्तर
i) जगात मृदा, खनिजे, वने आणि जल यांसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण भौगोलिक विविधतेमुळे असमान आहे
ii) ज्या प्रदेशात विशिष्ट साधनसंपत्ती मुबलक असते तेथून त्या मालाची निर्यात केली जाते आणि कमतरता असलेल्या प्रदेशात त्याची आयात होते
iii) हवामानातील विविधतेमुळे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये फरक पडतो परिणामी विशिष्ट हवामानातील उत्पादनांसाठी उदा. चहा, कॉफी व्यापार घडून येतो
iv) भौगोलिक विविधतेमुळे निर्माण झालेली सांस्कृतिक विविधता आणि विशिष्ट कलाकौशल्ये उदा. इराणी गालिचे, चिनी मातीची भांडी ही देखील व्यापारास चालना देतात
v) उत्पादनाचा खर्च आणि विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनातील निपुणता हे घटक भौगोलिक परिस्थितीशी निगडित असल्याने दोन देशांत व्यापार होतो
प्र. 3) खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : 9 गुण
- देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
- स्थलांतरित शेती आणि मळ्याची शेती
- जल वाहतूक आणि हवाई वाहतूक
- प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
- औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश
1) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
उत्तर
| क्र. | देणारा प्रदेश | घेणारा प्रदेश |
| i) | स्थलांतरामुळे लोक जो मूळ प्रदेश सोडून जातात त्या प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात | स्थलांतरामुळे लोक ज्या नवीन प्रदेशात जाऊन राहतात त्यास घेणारा प्रदेश म्हणतात |
| ii) | येथे लोकसंख्या सोडून जाण्यासाठी अपकर्षक घटक (उदा. रोजगाराच्या कमी संधी, युद्ध, दुष्काळ) कारणीभूत असतात | येथे स्थलांतरितांना आकर्षित करणारे आकर्षक घटक (उदा. उच्च राहणीमान, शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी) असतात |
| iii) | स्थलांतरामुळे या प्रदेशातील लोकसंख्या आणि घनता कमी होते | स्थलांतरामुळे या प्रदेशातील लोकसंख्या आणि घनता वाढते |
| iv) | प्रामुख्याने कार्यशील पुरुष बाहेर गेल्याने येथे अवलंबित लोकसंख्या व स्त्रियांचे प्रमाण वाढते | येथे कार्यशील लोकसंख्या आल्याने कार्यकारी लोकांचे व पुरुषांचे प्रमाण वाढते |
| v) | येथील पायाभूत सुविधांचा वापर कमी होतो किंवा त्या विनावापर राहतात | येथील पाणीपुरवठा, वाहतूक आणि निवासाच्या सुविधांवर मोठा ताण निर्माण होतो |
2) स्थलांतरित शेती आणि मळ्याची शेती
उत्तर
| क्र. | स्थलांतरित शेती | मळ्याची शेती |
| i) | वनातील आदिवासी लोक स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ही शेती करतात | ही शेती व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्यासाठी केली जाते |
| ii) | वनांतील भूभाग निवडून, झाडे तोडून व ती जाळून जमीन तयार केली जाते | येथे एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षे उत्पादन घेतले जाते, मशागत करुन शास्त्रीय पध्दतीने जमीन तयार केली |
| iii) | शेतीचा आकार अत्यंत लहान असतो आणि उत्पादनही कमी असते | मळ्याच्या शेतीचे क्षेत्र विस्तृत (मोठे) असून एकूण उत्पादन जास्त असते |
| iv) | येथे केवळ परंपरागत पध्दतीने दोन-तीन वर्षे उत्पादन घेऊन जमीन पडीक सोडली जाते | येथे शास्त्रीय ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान व मोठ्या भांडवलाचा वापर केला जातो व शास्त्रिय पध्दतीने, दिर्घकाळ पिके घेतली जातात |
| v) | यात धान्य, कडधान्य आणि रानभाज्यांचे उत्पादन घेतले जाते | यात चहा, कॉफी, रबर, कोको यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते |
3) जलवाहतूक आणि हवाईवाहतूक
उत्तर
| क्र. | जल वाहतूक | हवाई वाहतूक |
| i) | जल वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त व संथ प्रकार आहे | हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात महागडा व वेगवान प्रकार आहे |
| ii) | ही प्रामुख्याने अवजड व टिकाऊ वस्तूंच्या (उदा. खनिजे) वाहतुकीसाठी उपयुक्त असते | ही मौल्यवान व नाशवंत मालाच्या (उदा. दागिने, ताजी फळे) वाहतुकीसाठी वापरली जाते |
| iii) | जल वाहतुकीची वहन क्षमता अत्यंत जास्त असते | हवाई वाहतुकीची वहन क्षमता त्या तुलनेत मर्यादित असते |
| iv) | जल वाहतुकीचा वेग कमी असून वेळ जास्त लागतो | हवाई वाहतूक हा सर्वात वेगवान प्रकार असून यामुळे वेळेची मोठी बचत होते |
| v) | हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा मानला जातो | ही वाहतूक नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते |
4) प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
उत्तर
| क्र. | प्राकृतिक भूगोल | मानवी भूगोल |
| i) | पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या शाखेला प्राकृतिक भूगोल म्हणतात | मानव व पर्यावरण यांच्यातील संबंधातून निर्माण झालेल्या मानवनिर्मित पर्यावरणाचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो |
| ii) | यात निसर्ग (नैसर्गिक घटक) केंद्रस्थानी असतो | यात मानव हा अभ्यासाचा केंद्रबिंदू असतो |
| iii) | यात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास होतो | यात मानवाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्रियांचा अभ्यास केला जातो |
| iv) | भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र या याच्या उपशाखा आहेत | लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल या याच्या उपशाखा आहेत |
| v) | यात नैसर्गिक घटकांतील स्थळ-काळानुसार असणाऱ्या भिन्नतेची कारणमीमांसा असते | यात मानवी क्रियांमुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण केले जाते |
5) औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मकप्रदेश
उत्तर
| क्र. | औपचारिक प्रदेश | कार्यात्मक प्रदेश |
| i) | समान वैशिष्ट्ये असलेला आणि एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय | एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्रमुख कार्याच्या (Function) आधारे ठरविलेल्या प्रदेशास कार्यात्मक प्रदेश म्हणतात |
| ii) | औपचारिक प्रदेशाच्या सीमा निश्चित असतात | कार्यात्मक प्रदेश एखाद्या केंद्रबिंदूभोवती (Node) विकसित झालेला असतो |
| iii) | यात संपूर्ण क्षेत्रात समान गुणधर्म आढळतात | यात वैविध्यपूर्ण प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेश असू शकतात जे कार्यामुळे एकमेकांशी बांधलेले असतात |
| iv) | हा प्रदेश प्रामुख्याने नैसर्गिक किंवा राजकीय तत्त्वांवर आधारलेला असतो | हा प्रदेश प्रामुख्याने आर्थिक आणि सामाजिक आंतरक्रियांतून निर्माण होतो |
| v) | उदाहरणे: वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश किंवा एखादे राज्य | उदाहरणे: पुणे महानगर परिवहन क्षेत्र, टीव्ही सिग्नल क्षेत्र किंवा हॉटस्पॉट प्रभाव क्षेत्र |
प्र. 4) (a) दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील माहिती भरा (कोणतेही सहा) (सूची आवश्यक) : 6 गुण
1) भारतातील जास्त लोकसंख्येचे शहर – मुंबई
2) जगातील सर्वाधिक लिंगगुणोत्तर असणारा देश – रशिया
3) ग्रँड बँक मत्स्यक्षेत्र
4) कॅनडातील लाकूडतोड क्षेत्र
5) जपानमधील कोणताही एक औद्योगिक प्रदेश
6) दक्षिण अमेरिकेतील तेल उत्पादक देश – व्हेनेझुएला
7) दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख बंदर – केपटाऊन
8) ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग
________________________________________


प्र. 4) (b) दिलेल्या विभाजित वर्तुळाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 5 गुण
(लोकसंख्या वितरणाची टक्केवारी – 2019)
प्रश्न :
1) कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे?
उत्तर: आशिया खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे.
2) जागतिक लोकसंख्येपैकी 9.69 टक्के लोकसंख्या कोणत्या खंडात आहे?
उत्तर: उत्तर अमेरिका खंडात आहे.
3) सर्वांत कमी लोकसंख्या कोणत्या खंडात आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया खंडात सर्वात कमी लोकसंख्या आहे.
4) युरोप खंडात किती टक्के लोकसंख्या आहे?
उत्तर: युरोप खंडात 4.75% लोकसंख्या आहे.
5) वरील विभाजित वर्तुळात कोणता खंड नाही? आणि का?
उत्तर: अंटार्क्टिका खंड नाही, कारण तिथे कायमस्वरूपी मानवी वस्ती नाही.
प्रश्न 5 खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही तीन) : 12 गुण
1) स्थलांतराची कारणे
2. भारतातील प्रादेशिक विषमतेवर परिणाम करणारे घटक
3) जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध
4) संदेशवहनाची साधने
5) भूगोलाचे स्वरूप
1) स्थलांतराची कारणे
उत्तर
(i) स्थलांतर – जेव्हा व्यक्ती किंवा समूह एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी-जास्त कालावधीसाठी जातात तेव्हा त्यास स्थलांतर म्हणतात
(ii) प्राकृतिक कारणे: महापूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी आणि वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मानव इच्छेविरुद्ध स्थलांतर करतो
(iii) आर्थिक कारणे: रोजगाराच्या शोधात राहणीमान उंचावण्यासाठी आणि व्यावसायिक संधींसाठी लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात उदा. मुंबई ला अनेक राज्यातुन लोक कामधंदयाच्या शोधात येतात.
(iv) सामाजिक कारणे: भेदभाव सामाजिक असुरक्षितता विवाह शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभाव यांमुळे देखील लोक आपले मूळ ठिकाण सोडून जातात
(v) राजकीय कारणे: युद्धे राजकीय अस्थिरता किंवा देशाची फाळणी (उदा. भारत-पाकिस्तान) यांसारख्या कारणांमुळे लोकांना सक्तीने स्थलांतर करावे लागते
(vi) आकर्षक आणि अपकर्षक घटक: एखाद्या प्रदेशाकडे आकर्षित करणारी चांगली परिस्थिती (आकर्षक) आणि मूळ ठिकाण सोडण्यास भाग पाडणारी प्रतिकूल परिस्थिती (अपकर्षक) स्थलांतरास कारणीभूत ठरते
2) भारतातील प्रादेशिक विषमतेवर परिणाम करणारे घटक
(i) प्राकृतिक रचना: भारताच्या विविध भागांतील स्थान भू-उठाव समुद्रसपाटीपासूनची उंची आणि सुगमता यांमधील भिन्नतेमुळे प्रादेशिक विषमता आढळते. त्यामुळे भारतात पर्वतीय प्रदेशातील पुर्वेकडील राज्यांच्या तुलनेत पश्चिमेकडील राज्यांचा विकास झालेला आहे
(ii) साधनसंपत्तीची उपलब्धता: ज्या प्रदेशांत खनिजे आणि इतर नैसर्गिक संसाधने मुबलक आहेत तेथे विकास वेगाने होतो तर दुर्गम डोंगराळ भाग मागे पडतात. उदा. छोटा नागपुर चे पठारावर अनेक उदयोग व्यवसायांचा विकास झालेला आहे.
(iii) हवामान: विषम हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींना (उदा. पूर चक्रीवादळे) वारंवार बळी पडणाऱ्या प्रदेशांत विकासाचा दर कमी असतो. उदा. उत्तराखंड व कश्मीर
(iv) पायाभूत सुविधा: बंदरे विमानतळ आणि चांगल्या वाहतूक सुविधा असलेल्या प्रदेशांना इतरांच्या तुलनेत विकासाचा जास्त फायदा मिळतो. उदा. मुंबई, अहमदाबाद, चैन्नई, बंगलौर
(v) मानवी घटक: कुशल कामगार तंत्रज्ञान बाजारपेठेचे सान्निध्य बँकिंग आणि विमा सुविधा यांसारख्या मानवी घटकांचा अभाव असलेल्या प्रदेशांत विषमता जाणवते
(vi) शासकीय धोरण: उद्योगांचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरणाबाबतचे शासकीय निर्णय देखील प्रादेशिक विकास पातळीवर परिणाम करतात
3) जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध
उत्तर
(i) जन्मदर आणि मृत्युदर यांमधील तफावतीमुळेच कोणत्याही प्रदेशाच्या लोकसंख्येत वाढ किंवा घट होत असते
(ii) स्थिर अवस्था: जेव्हा जन्मदर आणि मृत्युदर दोन्हीही जास्त असतात तेव्हा लोकसंख्या वाढ अत्यंत कमी आणि स्थिर असते
(iii) विस्फोटाची अवस्था: जन्मदर जास्त असून वैद्यकीय प्रगतीमुळे मृत्युदर झपाट्याने घटतो तेव्हा लोकसंख्या वेगाने वाढते (लोकसंख्या विस्फोट)
(iv) नंतरच्या काळातील विस्तार: मृत्युदर आणखी कमी होतो आणि जन्मदरही कमी होऊ लागतो तरीही जन्मदर मृत्युदरापेक्षा जास्त असल्याने लोकसंख्या वाढतच असते
(v) अल्प बदल: जेव्हा जन्मदर आणि मृत्युदर दोन्हीही खूप कमी होतात तेव्हा लोकसंख्या वाढ अत्यंत नगण्य किंवा स्थिर होते
(vi) ऋणात्मक वाढ: काही देशांत जन्मदर हा मृत्युदरापेक्षाही कमी होतो अशा वेळी प्रत्यक्ष लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होते
4) संदेशवहनाची साधने
उत्तर
(i) संदेशवहन – माहिती कल्पना ज्ञान किंवा संदेशांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आदान-प्रदान करण्याच्या प्रक्रियेला संदेशवहन म्हणतात
(ii) पारंपारिक साधने: प्राचीन काळी चित्रे मुद्रा धूर ढोल वाजवणे किंवा घोडस्वार/सांडणीस्वारांमार्फत संदेश पाठवले जात असत
(iii) टपाल आणि तार यंत्रणा: टेलिग्राम टपालवाहक आणि पत्रांच्या माध्यमातून संदेशवहन करण्याची पद्धत दीर्घकाळ चालली
(iv) आधुनिक साधने: वर्तमान काळात दूरध्वनी (लँडलाईन) मोबाइल ईमेल आंतरजाल (इंटरनेट) आणि रेडिओ-टीव्ही ही प्रमुख साधने आहेत
(v) कृत्रिम उपग्रह: उपग्रहांमुळे अंतर हा अडथळा दूर झाला असून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात क्षणात माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे
(vi) बहुउपयोगिता: हवामानाचा अंदाज साधनसंपत्तीचा शोध आपत्ती व्यवस्थापन आणि जागतिक व्यापारासाठी आधुनिक संदेशवहन साधने अत्यंत महत्त्वाची आहेत
5) भूगोलाचे स्वरूप
उत्तर
(i) वर्णनात्मक स्वरूप: सुरुवातीच्या काळात भूगोलाचे स्वरूप प्रामुख्याने पृथ्वीवरील विविध प्राकृतिक घटकांचे वर्णन करण्यापुरते मर्यादित होते
(ii) कार्यकारणभावात्मक: भूगोल केवळ ‘काय’ याचे वर्णन करत नाही तर एखादी घटना ‘का’ आणि ‘कशी’ घडली यामागील भौगोलिक कारणांचा शोध घेतो
(iii) गतिशील स्वरूप: पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानवी घटक स्थिर नसून काळानुसार बदलत असल्याने भूगोलाचे स्वरूप अत्यंत गतिशील आहे
(iv) द्वैतवाद: भूगोलात निसर्ग श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ (निसर्गवाद वि. संभाव्यवाद) यांसारखे दोन परस्परविरोधी दृष्टिकोन प्रचलित आहेत
(v) आंतरविद्याशाखीय: भूगोलाचा संबंध खगोलशास्त्र अर्थशास्त्र इतिहास आणि समाजशास्त्र यांसारख्या अनेक शाखांशी असल्याने त्याचे स्वरूप व्यापक आहे
(vi) तांत्रिक विकास: आधुनिक काळात संगणक प्रणाली भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि उपग्रहीय तंत्रज्ञानामुळे (GPS) भूगोलाचे स्वरूप अधिक शास्त्रीय आणि तांत्रिक बनले आहे
प्र. 6 a) खाली दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा: 4 गुण
“सुमारे 3500 वर्षांपूर्वी क्रीट बेटावरील नॉसॉस हे शहर मिनॉन संस्कृतीचे मुख्य केंद्र होते. इ.स. पूर्व 500 पर्यंत ग्रीस हे पृथ्वीवरील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या क्षेत्रांपैकी एक बनले होते. ग्रीकांनी मुख्य भूमी व बेटांवर 500 हून अधिक शहरे व गावे वसवली होती. अथेन्स व स्पार्टा ही ग्रीसची प्रमुख शहरे होती. अथेन्स हे जगातील सर्वांत मोठे शहर असावे. त्या काळात अथेन्स शहरात अंदाजे 250000 रहिवासी वास्तव्य करत होते. ग्रीक शहरे धर्म आणि शक्तीची केंद्रे असूनही आर्थिक केंद्र म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शहरे ही मुख्य बाजारपेठ होती, जिथून श्रीमंत व्यापारी, जमीन आणि पशुधन मालक कार्यरत होते. शैक्षणिक केंद्रे म्हणून शहरातील रहिवाशांमध्ये शिक्षक व तत्त्वज्ञांचाही समावेश होता. त्या काळात हस्तकला उद्योगांचाही विकास झाला होता. शहरांच्या या सर्व भूमिकांमध्ये प्राचीन शहरे सांस्कृतिक, सामाजिक, शक्ती व अधिकार यांच्यातील परिवर्तनाची केंद्रबिंदू होती.”
प्रश्न :
1) ग्रीक कालखंडात जगातील सर्वात मोठे शहर कोणते होते?
उत्तर: अथेन्स हे जगातील सर्वांत मोठे शहर होते.
2) ग्रीक शहरांची भूमिका सांगा.
उत्तर: ग्रीक शहरे धर्म, शक्ती, आर्थिक व्यवहार, बाजारपेठ आणि शैक्षणिक परिवर्तनाची केंद्रबिंदू म्हणून काम करत होती.
3) अथेन्स शहराची अंदाजे लोकसंख्या किती होती?
उत्तर: अथेन्स शहराची अंदाजे लोकसंख्या 2,50,000 होती.
4) प्राचीन ग्रीक शहरात कोणकोणत्या सेवा सुविधा होत्या?
उत्तर: प्राचीन ग्रीक शहरात बाजारपेठ, शैक्षणिक केंद्रे (शिक्षक व तत्त्वज्ञ) आणि हस्तकला उद्योग यांसारख्या सेवा सुविधा होत्या.
प्रश्न 6 b) आकृतीकाढूननावेद्या (कोणतेहीदोन) : 2 गुण
1) रेषीय वस्ती

2) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची / सेवांची तरतूद.

3) मानवी भूगोलाच्या शाखा.

प्र. 7) खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा 8 गुण
1) विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये वितरणासह स्पष्ट करा.
2) उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
1) विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये वितरणासह स्पष्ट करा
उत्तर
प्रस्तावना: विस्तृत व्यापारी धान्य शेती ही प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात केली जाणारी आधुनिक शेती पद्धती आहे. विरळ लोकसंख्या आणि जमिनीची मुबलकता असलेल्या प्रदेशात व्यापाराच्या उद्देशाने ही शेती विकसित झाली आहे
वैशिष्ट्ये
(i) अक्षवृत्तीय स्थान: ही शेती दोन्ही गोलार्धात 30° ते 55° अक्षांशांच्या दरम्यान समशीतोष्ण कटिबंधात केली जाते
(ii) शेतीचा मोठा आकार: या शेती प्रकारात शेतजमिनीचा आकार अत्यंत विस्तृत असतो ज्यामुळे दरडोई शेतीचे प्रमाण अधिक असते
(iii) यांत्रिकीकरण: लोकसंख्या कमी असल्याने पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्टर हार्वेस्टर यांसारख्या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली जातात
(iv) एक पीक पद्धती: या शेतीत प्रामुख्याने गहू हे मुख्य पीक घेतले जाते त्याशिवाय मका बार्ली ओट्स आणि तेलबियांचे उत्पादन घेतले जाते
(v) मोठी भांडवल गुंतवणूक: आधुनिक यंत्रसामग्री रासायनिक खते कीटकनाशके आणि साठवणुकीच्या सोयींसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते
(vi) उत्पादकता: या शेतीत प्रति हेक्टरी उत्पादन कमी असते परंतु लोकसंख्या कमी असल्याने दरडोई उत्पादन खूप जास्त असते
(vii) व्यापारी उद्देश: ही शेती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धान्य निर्यात करण्यासाठी केली जाते
(viii) पशुपालन: विस्तृत धान्य शेतीमध्ये शेतीसोबतच व्यापारी तत्त्वावर पशुपालन हा जोडव्यवसाय देखील केला जातो
(ix) प्रगत शेतकरी: येथील शेतकरी सुशिक्षित आणि प्रगत असून ते आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाचा वापर करतात
वितरण
जगातील प्रमुख समशीतोष्ण गवताळ प्रदेशात ही शेती आढळते
• स्टेप्प्ज: रशिया आणि युरेशिया
• प्रेअरीज: उत्तर अमेरिका
• पंपाज: अर्जेंटिना (दक्षिण अमेरिका)
• वेल्ड: दक्षिण आफ्रिका
• डाउन्स: ऑस्ट्रेलिया
• कँटरबरी: न्यूझीलंड
अशा प्रकारे विस्तृत व्यापारी धान्य शेती ही पूर्णपणे यांत्रिक आणि बाजाराभिमुख असून जागतिक अन्नधान्य पुरवठ्यात या शेतीचा मोठा वाटा आहे
2) उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा
उत्तर
प्रस्तावना: उद्योगांची स्थापना कोणत्याही ठिकाणी सहज होत नाही. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी उद्योग अशा ठिकाणी स्थापन केले जातात जिथे उत्पादन खर्च कमी आणि वितरण सुलभ असते. उद्योगाच्या स्थाननिश्चितीवर प्रामुख्याने
अ) प्राकृतिक
ब) आर्थिक आणि
क) राजकीय घटकांचा प्रभाव पडतो
परिणाम करणारे घटक
अ) प्राकृतिक घटक
(i) कच्च्या मालाची उपलब्धता: कच्चा माल हा उद्योगांचा आधार असतो. लोह-पोलाद यांसारखे अवजड आणि वजन घटणारे उद्योग कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळच स्थापन होतात
(ii) हवामान: काही उद्योगांसाठी विशिष्ट हवामानाची गरज असते. उदा. सुती वस्त्रोद्योगासाठी दमट हवामान पूरक असते
(iii) पाणीपुरवठा: पोलाद कागद आणि कापड उद्योगांना प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते म्हणून हे उद्योग नद्या किंवा तलावांच्या काठी वसतात
(iv) ऊर्जा साधने: यंत्रे चालवण्यासाठी कोळसा खनिज तेल किंवा वीज यांसारख्या ऊर्जा साधनांची मुबलक उपलब्धता असणे आवश्यक आहे
(v) जमिनीची उपलब्धता: उद्योगाच्या इमारती आणि कामगारांच्या वसाहतींसाठी सपाट आणि स्वस्त जमीन आवश्यक असते
ब) आर्थिक घटक
(vi) मजूरपुरवठा: उद्योगांसाठी लागणारे कुशल आणि अकुशल मजूर दाट लोकवस्तीच्या प्रदेशातून सहज उपलब्ध होतात
(vii) वाहतूक सोयी: कच्चा माल कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आणि पक्का माल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी रस्ते रेल्वे किंवा जलवाहतुकीचे जाळे असणे गरजेचे आहे
(viii) बाजारपेठेचे सान्निध्य: उत्पादित मालाच्या त्वरित विक्रीसाठी आणि वाहतूक खर्च वाचवण्यासाठी बाजारपेठे जवळ असणे फायदेशीर ठरते
(ix) भांडवल: बँक सुविधा आणि मोठ्या गुंतवणुकीसाठी भांडवलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी उद्योगांचे केंद्रीकरण होते
क) राजकीय घटक
(x) शासकीय धोरण: सरकार उद्योगांना स्वस्त जमीन वीज आणि कर सवलती देऊन प्रोत्साहन देते. विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यांसारख्या धोरणांमुळे उद्योगांचे स्थानिकीकरण होते
थोडक्यात सांगायचे तर एखाद्या प्रदेशात वरील सर्व अनुकूल घटक एकत्रित उपलब्ध असल्यास त्या प्रदेशाचे औद्योगिक क्षेत्रात रूपांतर होते
वरील उत्तरपत्रिकेत अपेक्षीत उत्तरे देण्यात आली असली तरी, ही उत्तरपत्रिका केवळ एक शैक्षणिक साहीत्य आहे. त्यात काही चुक अथवा तृंटी असल्यास बोर्डा कडून प्रदर्शीत करण्यात आलेली ऊत्तरपत्रिका अंतिम असेल.
अधिक वाचा –
HSC 2021 Geography Question Paper and Answers
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
