HomeMoreनदीचे खनन व संचयन कार्य

नदीचे खनन व संचयन कार्य

नदीचे खनन व संचयन कार्य

Nadiche Khanan ani Sanchayan Karya


* नदीचे पाणी मार्गातील खडकांचे अपक्षरण करुन अवसांदाचे वहन करते व त्यानंतर त्यांचे संचयनही करते त्यातुन विविध भुरुपे तयार होत असतात ते पुढील प्रमाणे.

नदीचे खनन व संचयन कार्य


खनन कार्य- उगमाकडून पुढे……

1) घळई –

नदीच्या उगमाच्या भागात नदीच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने या भागात वाहते पाणी नदीच्या तळाचे खनन जास्त करते, त्या मुळे तीव्र उताराचे काठ व अंरुद (खालच्या भागात निमुळते होत जाणारे) तळ असलेले भुरुप तयार होते त्यास घळई म्हटले जाते. अशा जास्त खोल घळईला कॅनियन असेही म्हटले जाते उदा. उल्हास व नर्मदा नदीची घळई.


2) ‘व्ही’ आकाराची दरी-  

नदीचा प्रवाह पुढे गेल्यावर त्यात गाळाचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते, त्यामुळे तळभागावरील घर्षण कमी होवुन तळाचे खनन कमी होते मात्र नदीच्या काठावर काठांच्या उतारावर खनन होण्यास सुरवात होते. नदीचे तट / काठ रुदांवतात त्यामुळे नदीच्या दोन्ही काळांमधील रूंदी वाढते त्यातुन नदीपात्रास / नदीच्या दरीस इंग्रजीतील ‘व्हि’ आकार प्राप्त होतो अशा भुरुपास ‘व्ही’ आकाराची दरी म्हटले जाते.


3) धावत्या

जेव्हा नदी प्रवाह आलटून-पालटून कठीण व मृदु खडकांच्या स्तरांवरुन वाहन असते ते मृदू खडकांचे जास्त खननामुळे नदीपात्रात तीव्र उतार व पायऱ्यासारखा भाग तयार होतो. त्या उतारानुसार पाणी वेगाने खाली (धावते) जाते त्यास धावत्या असे म्हणतात. या ठिकाणी नदीचे पाणी फेसाळलेले व वेगवान असते. उदा. शरावती नदीवरील जोग, चंबळ नदीवरील छ्लीया धावत्या


4) धबधबे

नदीचे पाणी डोंगर कडा / उतारावरुन वेगाने खाली पडते त्यास धबधबा असे म्हटले जाते. असे धबधबे कठीण खडकांनतर मृदू खडक नदी प्रवाह मार्गात आल्याने मृदू खडकांचे खनन जास्त होवुन त्यामुळेदेखील तयार होतात.

धावत्या व प्रपात गर्ता


5) प्रपात गर्ता

धबधब्याच्या ठिकाणी खडकांवर वेगाने वरुन खाली पाणी पडत असल्याने अशा पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खोल खड्डा / खळगा तयार होतो त्यास प्रपातगर्ता असे म्हणतात.


6) कुंभगर्ता राजंणखळगा

 नदीपात्रात असलेले खडक कमकुवत असल्यास किंवा त्यांना तडे/जोड असल्यास अशा ठिकाणी वाहते पाणी अशा तडे/जोड यांच्या मध्ये शिरते पाण्यासोबत पाण्यातील खडे दगडेही आत शिरतात व पाण्याबरोबर ते चक्राकार फिरतात एकाच ठिकाणी दगडांच्या या चक्राकार फिरण्यामुळे त्याभागात वेधन प्रकीयेमुळे ते तडे आतमध्ये गोलाकार व मोठे होतात आणि तेथे खळगे तयार होते त्यालाच कुंभगर्ता राजणखळगा म्हणतात. उदा. नगर जिल्हयातील निघोड येथे कुकडी नदीतील राजणखळगे


नदीचे खनन व संचयन कार्य


नदीचे संचयन/ निक्षेपण कार्य-

7) पंखाकृती मैदान

जेव्हा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा या भागात जमीनीचा उतार मंदावलेला असतो त्यामुळे पाण्याचा प्रवाहाचा वेग ही मंदावतो त्यामुळे प्रवाहातील काही जड दगडगोटे व ओबधधोबड दगड (जड पदार्थ) या पायथ्यालगतच संचयीत होवू लागतात त्यातुन पंखाकृती मैदांनाची निर्मीती होते.


8) नागमोडी वळण

मैदानात नदी आल्यानंतरतिची बरीच उर्जा ही अवसादाच्या वहनात खर्च होत असते काही काळानंतर उपनदयांनी वाहुन आणलेला अवसाद व प्रमखनदीचा अवसाद असा भार वाढल्याने अवसाद पुढे वाहुन नेणे नदीला शक्य होत नाही. अशा वेळी छोटयाशा उंचवटयाने किंवा अडथळयाने नदीच्या प्रवाहाचीदिशा बदलते. ज्या बाजुकडे नदीचा प्रवाह वळतो त्याच्या बाह्यवळणावर अपक्षरण जास्त होवु लागते व वळणाच्या आतिल बाजुस संचनाचे कार्य वाढते वारंवार घडणाऱ्या या क्रियेमुळे नदी वळणे घेत वाहते अशा नदीच्या वळणांना नागमोडी वळणे म्हटले जाते.


9) नालाकृती सरोवर

मैदानी प्रदेशात नदीनागमोडी वळणे घेत वाहत असते ही वळणे पुढे अतिशय तीव्र झाल्यास दोन वळणांमधील भाग खुपच जवळ-जवळ येतो. अशा ठिकाणी पुरस्थीती झाल्यास  नदीचे पुराचे थोडे वेगवान पाणी हे वळण सोडून कमी अंतरांचा सरळ मार्ग अनुरसते त्यामुळे नागमोडी वळण मुख्य प्रवाहा पासुन वेगळे होते व त्या नदीच्या प्रवाहाच्या बाहेर राहेलेल्या जुन्याभागास नालाकृती आकार प्राप्त होतो अशा भरुपास नालाकृती सरोवर असे म्हणतात.


10) पुरमैदान

नदीला पुर आल्यास नदीचे अपक्षरणाचे कार्य वाढते व त्या प्रदेशात मंद उताराचे विस्तृत मैदान  तयार होते, त्यालाच पूरमैदान म्हणतात. या पुरमैदानांची मृदा शेतीसाठी उपयोगी असते


11) पुरतट

नदीला पुरआलेल्या काळात  पुरमैदाने पाण्यातील अवसादासह जलमय होतात, त्यामुळे नदीच्या काठावर भरड अवसादाचे निक्षेपण होते. हे निक्षेपण नदीच्या काठावर पुरतटांची निर्मीती करतात म्हणजेच नदीच्या काठांची उंची वाढवतात.


12) वितरीका

नदी समुद्राजवळच्या प्रदेशात येते तेव्हा याठिकाणी जमीनीचा उतार अतिशय मंद असतो तर नदीच्या पाण्यात गाळाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वाहत्या पाण्याला वेगही कमी असतो नदीची गाळ पुढे वाहुन नेण्याची क्षमता नसते त्यामुळे नदीतील पाण्यातील गाळ जागीच साचू लागतो व पाणी त्या गाळातुन मार्ग् काढत पुढे वाहु लागते त्यातुन नदीच्या अनेक वितरीकांची निर्मीती होते. म्हणजेच नदीचे एकाच प्रवाहातुन अनेक प्रवाहांची निर्मीती होते त्यास वितरीका संबोधले जाते.


13) त्रिभूज प्रदेश– नदी त्रिभूज प्रदेश खालील परीस्थीतीत निर्माण करते.

    i) नदीत अवसाद / गाळाचे प्रमाण जास्त असणे व     

    ii) नदीच्या मुखाजवळ समुद्र जास्त खोल नसणे.

    नदीने आपल्या सोबत वाहून आणलेल्या गाळाचे नदीच्या मुखा जवळ निक्षेपण होते, या निक्षेपणामुळे नदीच्या मुखाजवळ भाग हळूहळू भरुण आल्याने सदरचा गाळाचा भाग उंचावत जातो त्यामुळे नदीप्रवाहाला हळू-हळू अडथळा निर्माण होतो व नदी प्रवाहातील हाच गाळ अडथळयामुळे नंतर मोठया प्रमाणावर साचू लागतो त्यातुनच सुपीक गाळाचा त्रिकोणी आकाराचा प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभूज प्रदेश म्हणतात॰ उदा. गंगा व ब्रम्हपुत्रा नदीचा सुदंरबन नावाचा त्रिभूज प्रदेश.

 या उलट भारताची पश्चीम किनारपट्टी खोल आहे, येवुन मिळणाऱ्या नदया कमी लांबीच्या व कमी गाळ वाहुन आणनाऱ्या आहे, त्यामुळे पश्चीमकिनार पट्टीवर खांडयाची निर्मीती झालेली आहे.



अधिक वाचा

अकरावी भूगोल मुल्यमापन पध्दती व प्रश्नपत्रिका स्वरु

सागरी लाटांचे कार्य

बारावी भूगोल साखळी पुर्ण करा

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. सुबक आकृत्यांमुळे संकल्पना सहज व सोप्या झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page