HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
SUBJECT: GEOGRAPHY (39)
TOTAL MARKS : 80
सूचना :
(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.
(iii) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
(iv) नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
(v) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
(vi) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. (गुण 20)
(अ) अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा : (गुण 5)
| अ. क्र. | अ | ब | क |
| (१) | स्थलांतर | (क) मांसप्रक्रिया | (य) कुटिरोद्योग |
| (२) | नागरी समस्या | (ख) संदेशवहन | (र) दुग्धप्रक्रिया |
| (३) | प्राणिजन्य उद्योग | (ग) कागदीलगदा प्रक्रिया | (ल) वाहतूक |
| (४) | तृतीयक आर्थिक क्रिया | (घ) झोपडपट्टीमध्ये वाढ | (व) हवामानशास्त्र |
| (५) | प्राकृतिक भूगोल | (ड) भूरूपशास्त्र | (श) अनैच्छिक |
| (ङ) ऐच्छिक | (स) गुन्हेगारी |
उत्तर-
| अ. क्र. | अ | ब | क |
| (१) | स्थलांतर | (ङ) ऐच्छिक | (श) अनैच्छिक |
| (२) | नागरी समस्या | (घ) झोपडपट्टीमध्ये वाढ | (स) गुन्हेगारी |
| (३) | प्राणिजन्य उद्योग | (क) मांसप्रक्रिया | (र) दुग्धप्रक्रिया |
| (४) | तृतीयक आर्थिक क्रिया | (ख) संदेशवहन | (ल) वाहतूक |
| (५) | प्राकृतिक भूगोल | (ड) भूरूपशास्त्र | (व) हवामानशास्त्र |
(ब) खालील विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध ओळखा : (गुण 5)
(A: विधान, R: कारण)
(i)
A : लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ हा बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवितो.
R : लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ङ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- (ङ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही.
————————————————
(ii)
A : वस्तीचे विविध प्रकार असतात.
R : विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.
————————————————-
(iii)
A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R : मुंबई येथे मोठ्या प्रमाणात सिमेंट उद्योग आढळतात.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- (अ) केवळ A बरोबर आहे.
———————————————–
(iv)
A : वाहतूक ही द्वितीयक आर्थिक क्रिया आहे.
R : द्वितीयक आर्थिक व्यवसायात वाहतुकीची भूमिका महत्त्वाची असते.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही
उत्तर- (ब) केवळ R बरोबर आहे.
———————————————–
(v)
A : भूगोलात केवळ मानवी घटकांचा अभ्यास केला जातो.
R : भूगोल अभ्यासकांना विविध कौशल्यांची आवश्यकता आहे.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- (ब) केवळ R बरोबर आहे.
————————————————-
(क) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा : (गुण 5)
(i) उतरत्या वयोगटानुसार योग्य क्रम लावा –
(अ) बालक
(ब) प्रौढ
(क) वृद्ध
(ड) युवा
उत्तर- (क) वृद्ध (ब) प्रौढ (ड) युवा (अ) बालक
(ii) वस्त्यांच्या आकारानुसार मोठ्यापासून लहानाकडे योग्य क्रम लावा –
(अ) उपनगर
(ब) महाकायनगर
(क) नगर
(ड) महानगर
उत्तर- (ब) महाकायनगर (ड) महानगर (क) नगर (अ)उपनगर
(iii) जास्त भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योग उतरत्या क्रमाने लावा
(अ) सुतारकाम
(ब) लोहपोलाद उद्योग
(क) खेळणी निर्मिती उद्योग
(ड) दुग्धप्रक्रिया उद्योग
उत्तर– (ब) लोहपोलाद उद्योग (ड) दुग्धप्रक्रिया उद्योग (क) खेळणी निर्मिती उद्योग (अ) सुतारकाम
(iv) तृतीयक व्यवसाय ओळखा –
(अ) शिकार
(ब) शेती
(क) व्यापार
(ड) सुतीकापड उद्योग
उत्तर- क) व्यापार
(v) भूगोल अभ्यासकाच्या कौशल्यातील अयोग्य घटक ओळखा –
(अ) निरीक्षण
(ब) नकाशा निर्मिती
(क) विदा संकलन
(ड) संवाद कौशल्य
उत्तर- ड) संवाद कौशल्य
———————————————-
(ड) खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा : (गुण 5)
(i) लोकसंख्येतील साक्षरता प्रमाण हे देशाच्या विकासाचे द्योतक आहे.
उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे
(ii) वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण करता येत नाही.
उत्तर- दिलेले विधान चूक आहे
(iii) साखर उद्योग हे कच्चामाल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होतात.
उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे
(iv) बंदरासाठी दंतुर किनारीप्रदेश अयोग्य असतात.
उत्तर- दिलेले विधान चूक आहे
(v) भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत.
उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्र. 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही चार) : (गुण 12)
(i) विकसित राष्ट्रांमध्ये शेतीव्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
(ii) rural वसाहतींमध्ये भूमिउपयोजन हे शेतीशी निगडित असते.
(iii) विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
(iv) जगात उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते.
(v) पनामा कालवा पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
(vi) प्रादेशिक विकासात प्राकृतिक घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
1) विकसित राष्ट्रांमध्ये शेतीव्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
उत्तर–
I) विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठया प्रमाणात झालेला असतो.
II) विकसीत देशांतील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने द्वितीयक,तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतलेली असते. अशा देशात शेतीत देखिल तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असतो
III) शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर मोठया प्रमाणात वाढल्यामुळे कमी मनुष्यबळात जास्त उत्पादन घेणे शक्य होत असते तसेच शेतीतील दरडोई उत्पन्न देखिल जास्त असते
IV) या राष्ट्रांची अर्थव्यवस्था केवळ कृषीप्रधान नसून ती सेवा क्षेत्रावर अधिक अवलंबून असते. चांगल्या उदयोग व्यापारामुळे शेती देखील व्यापारी तत्वाने केली जात असते, तंत्रज्ञानामुळे कमी मनुष्यबळावर देखील शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे होत असतो
V) तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीतील मिळणारे भरपुर उत्पन्न व रोजगाराच्या इतर संधीची सहज उपलब्धता यामुळे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
———————————————–
2) Rural (ग्रामीण) वसाहतींमध्ये भूमिउपयोजन हे शेतीशी निगडित असते.
उत्तर–
I) ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य उदरनिर्वाहाचा मार्ग हा प्राथमिक (शेती) असतो. प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या व शेती व्यवसातील लोकांचे प्रमाण तेथे जास्त असते.
II) ग्रामीण भागात प्रत्यक्ष लागवडी खालील क्षेत्र जास्त असते तसेच ग्रामिण भागातील मोठया प्रमाणावर पशुपालनासाठी चराऊ कुरण म्हणून वापरला जातो.
III) ग्रामिण भागात शेतीव्यवसाया बरोबरच शेतीसंमधी इतर वनक्षेत्र, फळबागा, ओसाड जमीन, पडीक जमीन क्षेत्र देखील आढळून येत असते
IV) ग्रामीण अर्थव्यवस्थेत बिगरशेती व्यवसायांचे प्रमाण कमी प्रमाणात असते. उदा. व्यापारी संकुले उद्योग, मोठी दुकाने
V) ग्रामीण भूमी उपयोजनात लागवडीखालील क्षेत्र आणि पडीक जमिनीचा समावेश होतो, ग्रामिण भागात शेती भागात किरकोळ वृक्षांची संख्या जास्त असते, तसेच वनराई देखील आढळुन येत असते जे थेट शेतीशी संबंधित आहे.
VI) त्यामुळे ग्रामीण वस्त्यांमध्ये भूमीचा वापर प्रामुख्याने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उत्पादनासाठी केला जातो.
————————————————
3) विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
उत्तर–
I) विस्तृत शेती 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशात केली जाते. या शेतीप्रकारात शेतजमिनीचा आकार खूप मोठा असतो, जो शेकडो हेक्टरमध्ये असू शकतो.
II) या शेती प्रकारात नफा मिळवणे हा मुख्य व्यापारी उद्देश असल्याने ती बाजारपेठेवर आधारित असते.
III) पेरणीपासून ते कापणीपर्यंतची सर्व कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली जातात.
IV) मोठया प्रमाणावर भांडवल गुतंवणुक, तंत्रज्ञानाचा वापर, खते, पाणीपुरवठ्याचा, साधनांचा व बियाणांचा वापर करुन जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा उद्देश असतो.
V) या शेतीप्रकारात दरडोई उत्पादन जास्त असते आणि उत्पादित माल प्रामुख्याने विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवला जातो.
VI) म्हणून विस्तृत शेतीला ‘व्यापारी धान्य शेती’ असेही संबोधले जाते.
————————————————
4) जगात उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते.
उत्तर–
I) उद्योगांच्या स्थापनेसाठी कच्चा माल, पाणी आणि ऊर्जा साधनेंची उपलब्धता आवश्यक असते, जी जगात सर्वत्र समान नाही.
II) काही प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असतात, तर काही प्रदेश दुर्गम आणि साधनसंपत्ती विरहित असतात.
III) वाहतुकीच्या सोयी, कुशल कामगार आणि बाजारपेठ यांसारख्या मानवी घटकांचा विकास काही विशिष्ट भागातच झालेला आढळतो.
IV) विविध देशांतील शासकीय धोरणे आणि भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण वेगवेगळ्या प्रदेशात भिन्न असते.
V) या नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमधील विषमतेमुळे जगात उद्योगांचे वितरण असमान आढळते.
——————————————–
5) पनामा कालवा पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
उत्तर–
I) पनामा कालवा हा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा कृत्रिम जलमार्ग आहे.
II) या कालव्यामुळे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीमधील सागरी अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
III) पॅसिफिक महासागरातील बेटांकडे आणि आशिया खंडाकडे जाणाऱ्या जहाजांसाठी हा एक धोरणात्मक मार्ग ठरतो.
IV) आंतरराष्ट्रीय व्यापारात अटलांटिककडून पॅसिफिकमध्ये प्रवेश करण्यासाठी या कालव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
V) व्यापारी जहाजांना पॅसिफिकमध्ये प्रवेशासाठी हा सुलभ मार्ग उपलब्ध करून देतो म्हणून त्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणतात.
—————————————–
6) प्रादेशिक विकासात प्राकृतिक घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
उत्तर–
I) प्रादेशिक विकासात हवामान, भूरचना आणि पाण्याची उपलब्धता हे प्राकृतिक घटक पायाभूत भूमिका बजावतात.
II) सुपीक मृदा आणि पाण्याची उपलब्धता असलेल्या सुपीक मैदानी प्रदेशांत शेती आणि उद्योगांचा विकास वेगाने होतो.
III) याउलट, दुर्गम डोंगराळ भाग किंवा अतिविषम हवामानाच्या प्रदेशात वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात अडथळे येतात.
IV) नैसर्गिक बंदरे आणि लांब समुद्रकिनारा लाभलेल्या प्रदेशांना आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विकासाचा अधिक फायदा मिळतो.
V) थोडक्यात, प्राकृतिक घटकांची अनुकूलता ही कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा मुख्य आधार असते.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्र. 3. फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) : (गुण ९)
(i) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
(ii) ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती
(iii) उद्यानशेती आणि मंडई शेती
(iv) अवजड उद्योग आणि हलके उद्योग
(v) प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
(i) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
उत्तर-
| देणारा प्रदेश (Out-migration Region) | घेणारा प्रदेश (In-migration Region) |
| (i) ज्या प्रदेशातून लोक दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात, त्या प्रदेशास ‘देणारा प्रदेश’ म्हणतात. | (i) ज्या प्रदेशात लोक इतर प्रदेशातून येऊन स्थायिक होतात, त्या प्रदेशास ‘घेणारा प्रदेश’ म्हणतात. |
| (ii) या प्रदेशात अपकर्ष घटक (उदा. बेरोजगारी, दुष्काळ, पायाभूत सुविधांची कमतरता) जास्त प्रभावी असतात. | (ii) या प्रदेशात आकर्ष घटक (उदा. रोजगाराच्या संधी, उच्च जीवनमान, चांगल्या सुविधा) जास्त प्रभावी असतात. |
| (iii) या प्रदेशातून लोकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कार्यशील लोकसंख्येचा तुटवडा निर्माण होतो. | (iii) या प्रदेशात बाहेरून लोक आल्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते व संसाधनांवर ताण येतो. |
| (iv) येथे मनुष्यबळ कमी झाल्यामुळे भूमी उपयोजन आणि आर्थिक विकासाचा वेग मंदावतो. | (iv) येथे मुबलक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे औद्योगिक व आर्थिक विकास वेगाने होतो. |
| (v) या प्रदेशातील लिंग गुणोत्तर (विशेषतः पुरुषांचे स्थलांतर झाल्यास) वाढू शकते किंवा वयोरचनेत बदल होतो. | (v) या प्रदेशात पुरुषांचे प्रमाण वाढल्याने लिंग गुणोत्तर कमी होऊ शकते व तरुण लोकसंख्येचे प्रमाण वाढते. |
(ii) ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती
उत्तर-
| ग्रामीण वस्ती (Rural Settlement) | शहरी वस्ती (Urban Settlement) |
| (i) ज्या वस्तीतील बहुतांश लोक प्राथमिक व्यवसायांत (उदा. शेती, पशुपालन, मासेमारी) गुंतलेले असतात, तिला ग्रामीण वस्ती म्हणतात. | (i) ज्या वस्तीतील बहुतांश लोक द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायांत गुंतलेले असतात, तिला शहरी वस्ती म्हणतात. |
| (ii) ग्रामीण वस्त्यांमध्ये लोकसंख्येचा आकार लहान आणि लोकसंख्येची घनता कमी असते. | (ii) शहरी वस्त्यांमध्ये लोकसंख्येचा आकार मोठा आणि लोकसंख्येची घनता जास्त असते. |
| (iii) येथे मुख्यत्वे शेतीशी निगडित भूमी उपयोजन (लागवडीखालील जमीन, चराऊ कुरणे) आढळते. | (iii) येथे बिगरशेती भूमी उपयोजन (उदा. निवासी क्षेत्रे, कारखाने, दुकाने, रस्ते) जास्त आढळते. |
| (iv) ग्रामीण भागात सामाजिक संबंध अधिक निकटचे व अनौपचारिक असतात. | (iv) शहरांमध्ये जीवनमान गतिमान असून सामाजिक संबंध दुरावलेले किंवा औपचारिक असतात. |
| (v) येथे पायाभूत सुविधा व सेवा (उदा. रुग्णालये, उच्च शिक्षण, वाहतूक) मर्यादित असतात. | (v) येथे आधुनिक पायाभूत सुविधा व विविध सेवा (उदा. बँकिंग, जलद वाहतूक, उच्च शिक्षण) मुबलक असतात. |
(iii) उद्यानशेती आणि मंडई शेती
उत्तर-
| उद्यानशेती (Horticulture / Fruit Farming) | मंडई शेती (Market Gardening) |
| (i) प्रामुख्याने फळे आणि फुलांचे उत्पादन घेण्यासाठी केली जाणारी आधुनिक शेती म्हणजे उद्यानशेती होय. | (i) जवळच्या शहरी बाजारपेठेची भाजीपाल्याची गरज भागवण्यासाठी केली जाणारी शेती म्हणजे मंडई शेती होय. |
| (ii) या शेती प्रकारात पिकांचा कालावधी दीर्घकालीन (वर्षानुवर्षे) असतो (उदा. आंबा, सफरचंद, संत्री बाग). | (ii) या शेती प्रकारात पिकांचा कालावधी अल्पकालीन (काही महिने) असतो (उदा. टोमॅटो, पालेभाज्या). |
| (iii) यासाठी भांडवल गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता सुरुवातीला व दीर्घकाळासाठी असते. | (iii) यासाठी लागवडीपासून विक्रीपर्यंत जलद वाहतुकीवर आणि दैनंदिन व्यवस्थापनावर भर दिला जातो. |
| (iv) उत्पादित माल हा स्थानिक बाजारासोबतच लांबच्या बाजारपेठेत किंवा परदेशात निर्यातीसाठी पाठवला जातो. | (iv) उत्पादित माल हा मुख्यत्वे जवळील नागरी/शहरी बाजारपेठेत दररोज पाठवला जातो. |
| (v) या शेतीत पिकांची काढणी हंगामांनुसार ठराविक काळातच होते. | (v) या शेतीत वर्षभर सातत्याने विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. |
(iv) अवजड उद्योग आणि हलके उद्योग
उत्तर-
| अवजड उद्योग (Heavy Industry) | हलके उद्योग (Light Industry) |
| (i) ज्या उद्योगांमध्ये प्रचंड वजनाचा कच्चा माल वापरला जातो व तयार मालही वजनाने भारी असतो, त्यांना अवजड उद्योग म्हणतात. | (i) ज्या उद्योगांमध्ये कमी वजनाचा/हलका कच्चा माल वापरला जातो व तयार मालही वजनाने हलका असतो, त्यांना हलके उद्योग म्हणतात. |
| (ii) या उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची, अवजड यंत्रसामग्रीची आणि भांडवलाची गरज असते. | (ii) या उद्योगांसाठी कमी जमीन, लहान यंत्रे आणि तुलनेने कमी भांडवलाची आवश्यकता असते. |
| (iii) हे उद्योग पर्यावरणावर अधिक परिणाम करतात व प्रदूषण जास्त प्रमाणात होऊ शकते. | (iii) हे उद्योग कमी प्रदूषणकारक असतात आणि शहरांच्या जवळही स्थापन करता येतात. |
| (iv) उदाहरण: लोह-पोलाद उद्योग, जहाजबांदणी उद्योग, सिमेंट उद्योग. | (iv) उदाहरण: घड्याळ बनवणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणे, औषध निर्माण उद्योग. |
(v) प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
उत्तर-
| प्राकृतिक भूगोल (Physical Geography) | मानवी भूगोल (Human Geography) |
| (i) नैसर्गिक घटक आणि प्रक्रियांचा (उदा. भूरूपे, हवामान, मृदा, जलप्रणाली) अभ्यास करणाऱ्या शाखेला प्राकृतिक भूगोल म्हणतात. | (i) मानव आणि त्याचा नैसर्गिक पर्यावरणाशी असणारा सहसंबंध व मानवी क्रियांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला मानवी भूगोल म्हणतात. |
| (ii) या शाखेचा मुख्य विषय निसर्ग आणि त्याची कार्यप्रणाली हा आहे. | (ii) या शाखेचा मुख्य विषय मानव, त्याची संस्कृती, लोकसंख्या व आर्थिक क्रिया हा आहे. |
| (iii) यात अजैविक आणि नैसर्गिक घटकांचा (उदा. पर्वत, नद्या, तापमान, पर्जन्य) समावेश होतो. | (iii) यात सांस्कृतिक आणि मानवनिर्मित घटकांचा (उदा. वस्त्या, शेती, उद्योग, वाहतूक) समावेश होतो. |
| (iv) याच्या प्रमुख उपशाखा: भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जलशास्त्र, मृदा भूगोल इत्यादी आहेत. | (iv) याच्या प्रमुख उपशाखा: लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, नागरी भूगोल, राजकीय भूगोल इत्यादी आहेत. |
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्र. 4. (अ) तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी योग्य चिन्हाच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा) : (गुण 6)
(i) आशियातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला देश
(ii) सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील साक्षरता कमी असणारा आफ्रिकन प्रदेश
(iii) संयुक्त संस्थानातील व्यापारी शहर
(iv) दक्षिण अमेरिकेतील व्यापारी तत्त्वावर चालणारे पशुपालन क्षेत्र
(v) पर्थ औद्योगिक प्रदेश
(vi) मुंबई ते लंडन विमान मार्ग
(vii) दक्षिण गोलार्धातील बर्फाच्छादित खंड
(viii) नाईल नदीचे खोरे

HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
(ब) दिलेल्या स्तंभालेखाचे (विविध प्रदेशातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी) वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा : (गुण 5)
प्रश्न :
i) दिलेल्या स्तंभालेखात काय दर्शविले आहे?
उत्तर– दिलेल्या स्तंभालेखात विविध प्रदेशातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी दर्शविली आहे.
ii) ‘ब’ प्रदेशात दारिद्र्यरेषेखालील किती लोकसंख्या आहे?
उत्तर-‘ब’ प्रदेशात 35 % लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे.
iii) सर्वात जास्त दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या प्रदेशात आहे?
उत्तर– सर्वात जास्त दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ‘ड’ प्रदेशात (50%) आहे.
iv) दारिद्र्यरेषेखालील सर्वात कमी टक्केवारी कोणत्या प्रदेशात आहे?
उत्तर– दारिद्र्यरेषेखालील सर्वात कमी टक्केवारी ‘अ’ प्रदेशात (15%) आहे.
v) 45 % दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या कोणत्या प्रदेशात आहे?
उत्तर– 45 % दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या ‘क‘ प्रदेशात आहे.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्र. 5. खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही तीन) : (गुण 12)
(i) हवामानाचा लोकसंख्या वितरणावरील परिणाम
(ii) मालकीवर आधारित उद्योगांचे वर्गीकरण
(iii) जलवाहतूक
(iv) प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे
(v) भूगोलाचे स्वरूप
(1) हवामानाचा लोकसंख्या वितरणावरील परिणाम
I) सर्वाधिक प्रभावी घटक: हवामान हा लोकसंख्येच्या वितरणावर थेट आणि अत्यंत प्रभावी परिणाम करणारा महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे.
II) अनुकूल हवामानाचे प्रदेश: समशीतोष्ण, आल्हाददायक आणि पुरेसा पाऊस असलेल्या प्रदेशांत मानवी राहणीमानासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने लोकसंख्या दाट आढळते उदा. पश्चिम यूरोप, किनाऱ्याचे प्रदेश.
III) अतिविषम हवामान: अतिउष्ण वाळवंटी प्रदेश (उदा. सहारा वाळवंट), अतिशीत ध्रुवीय प्रदेश (उदा. अंटार्क्टिका, ग्रीनलँड) आणि अतिपर्जन्याचे विषुववृत्तीय प्रदेश येथे हवामान मानवी आरोग्यास आणि आर्थिक क्रियांना प्रतिकूल असल्याने लोकसंख्या अत्यंत विरळ असते.
IV) शेती व आर्थिक क्रियांवर परिणाम: हवामानावर शेतीची उत्पादकता अवलंबून असते. मान्सून हवामानाच्या प्रदेशात पुरेसा पाऊस आणि अनुकूल तापमानामुळे बहुपीक पद्धती शक्य होते, परिणामी तेथे लोकसंख्या दाट असते.
V) पाण्याची उपलब्धता: मान्सून व समशीतोष्ण हवामानात पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची उपलब्धता सहज होत असल्याने तेथे मानवी वस्त्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित होतात.
VI) रोगराई व आरोग्य: अतिउष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात किटक व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो, ज्यामुळे मानवी वस्त्यांच्या विस्तारावर मर्यादा येतात.
VII) निष्कर्ष: थोडक्यात, जेथे हवामान मानवी जीवनास व आर्थिक विकासास पूरक असते, तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण जास्त आढळते.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
(2) मालकीवर आधारित उद्योगांचे वर्गीकरण
I) सार्वजनिक क्षेत्र : हे उद्योग पूर्णपणे शासनाच्या (केंद्र किंवा राज्य सरकार) मालकीचे आणि नियंत्रणाखाली असतात. नफ्यापेक्षा समाजकल्याण हे याचे मुख्य उद्दिष्ट असते उदा. – BHEL, रेल्वे
II) खाजगी क्षेत्र : या उद्योगांची मालकी एखाद्या व्यक्तीकडे किंवा व्यक्तींच्या समूहाकडे असते. हे उद्योग प्रामुख्याने नफा मिळवण्याच्या उद्देशाने चालवले जातात (उदा. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी – TISCO).
III) संयुक्त क्षेत्र : हे उद्योग शासन आणि खाजगी व्यक्ती/संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जातात. यात भांडवल आणि व्यवस्थापन दोघांचेही योगदान असते (उदा. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड – MNGL).
IV) सहकारी क्षेत्र : ज्या उद्योगांची मालकी आणि संचालन कच्चा माल पुरवणारे शेतकरी, कामगार किंवा ग्राहक एकत्रित येऊन करतात, त्यांना सहकारी उद्योग म्हणतात (उदा. अमूल, साखर कारखाने).
V) बहुराष्ट्रीय क्षेत्र : ज्या उद्योगांचे मुख्यालय एका देशात असते, परंतु त्यांचे उत्पादन आणि व्यापार अनेक देशांमध्ये विस्तारलेला असतो (उदा. ॲपल, मायक्रोसॉफ्ट, युनिलिव्हर).
VI) महत्त्व : उद्योगांच्या या मालकी प्रकारांमुळे देशातील भांडवल उभारणी, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला दिशा मिळते.
(3) जलवाहतूक
I) सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग: जलवाहतूक हा नैसर्गिक जलमार्गांचा वापर करत असल्याने रस्त्यांच्या किंवा रूळांच्या निर्मितीचा खर्च वाचतो, त्यामुळे हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त पर्याय आहे.
II) अवजड मालासाठी उपयुक्त : प्रचंड वजनाचा, आकारमानाने मोठा असणारा आणि कमी मूल्याचा कच्चा माल (उदा. लोहखनिज, कोळसा, कच्चा तेल, धान्य) लांबच्या अंतरावर वाहून नेण्यासाठी जलवाहतूक अत्यंत आदर्श मानली जाते.
III) प्रकार: जलवाहतुकीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात – १) अंतर्गत जलवाहतूक (नद्या, कालवे, तलाव) आणि २) सागरी जलवाहतूक (महासागर व समुद्र).
IV) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा: जगातील जागतिक व्यापारापैकी ८०% पेक्षा जास्त व्यापार सागरी जलमार्गाने होतो. पनामा आणि सुएझ यांसारखे कालवे आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीत अत्यंत महत्त्वाचे आहेत.
V) कमी इंधन खर्च व पर्यावरणपूरक: इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत जलवाहतुकीत इंधनाचा वापर प्रतिटन कमी होतो, ज्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन तुलनेने कमी होते. मार्ग नैसर्गीक असल्याने अतिरिक्त पणे पर्यावरणावर होणारा इतर ताण कमी होतो.
VI) मर्यादा : जलवाहतुकीचा वेग कमी असतो आणि ती नैसर्गिक हवामान, वादळे तसेच बंदरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
(4) प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे
I) प्रादेशिक असमतोलाची कारणे: निसर्गाची विषमता, पायाभूत सुविधांचा असमतोल विकास आणि शासकीय दुर्लक्ष यांमुळे काही प्रदेश विकसित तर काही मागास राहतात.
II) मागास भागांत गुंतवणुकीस प्रोत्साहन: मागासलेल्या किंवा दुर्गम भागात उद्योगांची स्थापना करण्यासाठी सरकार करसवलत, स्वस्त जमीन, वीज व कर्जावर सबसिडी यांसारख्या सवलती देते.
III) पायाभूत सुविधांचा विकास: रस्ते, रेल्वे, वीज, पाणी आणि दळणवळण यांसारख्या पायाभूत सुविधा मागास भागात प्राधान्याने विकसित करून तेथील आर्थिक क्रियांना गती दिली जाते.
IV) विशेष विकास मंडळ व निधी: विशिष्ट मागास प्रदेशांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी आणि विकास मंडळांची स्थापना केली जाते (उदा. महाराष्ट्रातील वैधानिक विकास मंडळे).
V) औद्योगिक विकेंद्रीकरण: एकाच शहरात किंवा प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण रोखण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहती (उदा. MIDC) मागास जिल्ह्यात स्थापन केल्या जातात.
VI) मानव संसाधन विकास: मागास भागांत शिक्षण, आरोग्य आणि तांत्रिक प्रशिक्षणाच्या सुविधा वाढवून तेथील कार्यशील लोकसंख्येची क्षमता वाढवली जाते.
VII) नियोजनबद्ध विकास: केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे प्रादेशिक संतुलन साधून देशाचा सर्वांगीण विकास करणे हे या धोरणांचे मुख्य ध्येय असते.
(5) भूगोलाचे स्वरूप
I) गत्यात्मक आणि परिवर्तनशील स्वरूप: भूगोल हे स्थिर शास्त्र नसून त्याचे स्वरूप सातत्याने बदलते आणि विकसित होत जाणारे (Dynamic) आहे.
II) आंतरविद्याशाखीय स्वरूप (Interdisciplinary): भूगोलाचा संबंध प्राकृतिक विज्ञानाशी (हवामानशास्त्र, भूगर्भशास्त्र) तसेच सामाजिक विज्ञानाशी (अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास) थेट जोडलेला आहे.
III) द्वैतवाद (Dualism): भूगोलाच्या अभ्यासात द्वैतवाद आढळतो, जसे की प्राकृतिक भूगोल विरुद्ध मानवी भूगोल आणि प्रादेशिक भूगोल विरुद्ध क्रमबद्ध (Systematic) भूगोल.
IV) कार्यकारणभाव (Cause-Effect Relationship): भूगोल केवळ घटकांचे वर्णन करत नाही, तर ‘काय, कुठे, केव्हा आणि का‘ या प्रश्नांची उत्तरे शोधून घटकांमधील कार्यकारणभाव स्पष्ट करतो.
V) स्थानिक व अवकाशीय विश्लेषण: पृथ्वीवरील घटकांचे वितरण, त्यांच्यातील अंतर, आकृतीबंध आणि अवकाशीय (Spatial) संबंधांचा अभ्यास करणे हे भूगोलाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
VI) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: आधुनिक काळात भूगोलाच्या अभ्यासात उपग्रह प्रतिमा, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (GPS) आणि संगणकीय नकाशाशास्त्र यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्र. 6. (अ) खाली दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा : (गुण 4)
जागतिक लोकसंख्या विकास 1950 पासून पृथ्वीवर राहणाऱ्या एकूण लोकांची संख्या दुप्पट झाली आहे आणि ती वाढतच आहे. 2015 मध्ये जगाची लोकसंख्या सुमारे 7.38 अब्ज होती. सामान्य युगाच्या सुरुवातीपासून जगाच्या लोकसंख्येच्या विकासावर एक नजर टाकल्यास असे दिसून येते की संख्येत इतकी वाढ अभूतपूर्व आहे. ब्लॅक डेथने जगभरात सुमारे 25 दशलक्ष लोकांचा बळी घेतल्यानंतर, 14 व्या शतकात लोकसंख्येमध्ये प्रथमच लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर 1950 आणि 2000 च्या दरम्यान जागतिक लोकसंख्या हळूहळू परंतु स्थिरपणे वाढली.
जगातील बहुसंख्य लोकसंख्या आशिया खंडात राहते. सुमारे 100 वर्षांमध्ये, असा अंदाज आहे की आफ्रिकन खंडातील लोकसंख्येची पातळी आज आशियामध्ये आपण पाहत असलेल्या पातळीवर पोहोचली असेल. जगाच्या लोकसंख्येच्या विकासाच्या अंदाजानुसार 22 व्या शतकापर्यंत ही आकडेवारी 10 अब्जांपेक्षा जास्त पोहोचेल असा अंदाज आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे पृथ्वीला धोका निर्माण होत आहे. प्रचंड लोकसंख्या वाढीच्या गतीने अन्न आणि संसाधनांच्या वापराचे प्रमाणही वाढत आहे. शास्त्रज्ञांना काळजी वाटते की नैसर्गिक संसाधने, जसे की तेल आणि अन्न संसाधने दुर्मीळ होतील, ज्यामुळे मानवजाती आणि त्याहीपेक्षा जगाची परिसंस्था धोक्यात येईल.
प्रश्न :
(1) जागतिक लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ प्रथम कधी झाली?
उत्तर: 14 व्या शतकात ‘ब्लॅक डेथ’ने जगभरात सुमारे पंचवीस दशलक्ष लोकांचा बळी घेतल्यानंतर जागतिक लोकसंख्येमध्ये प्रथमच लक्षणीय वाढ झाली.
(2) जगातील सर्वाधिक लोकसंख्येला कोणता खंड आधार देतो?
उत्तर:: जगातील बहुसंख्य लोकसंख्येला आशिया खंड आधार देतो
(3) 22 व्या शतकापर्यंत जगाची अंदाजे लोकसंख्या किती असेल?
उत्तर:: 22 व्या शतकापर्यंत जगाची अंदाजे लोकसंख्या दहा अब्जांपेक्षा जास्त पोहोचेल.
(4) वाढती लोकसंख्या पृथ्वीला धोका आहे असे तुम्हाला वाटते का? कसे?
उत्तर:: होय,
कारण: लोकसंख्येच्या वाढीमुळे अन्न आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढत आहे.
नैसर्गिक संसाधने कमी-कमी होत असून मानवी जीवनासोबतच संपूर्ण पृथ्वीची परिसंस्था धोक्यात येत आहे.
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
(ब) आकृती काढून नावे द्या (कोणतेही दोन ) : (गुण 4)
(i) जगातील गवताळ प्रदेशांचे प्रकार व नावे
(ii) उत्पादनावर आधारित उद्योगांचे प्रकार
(iii) व्यापार आणि वाणिज्य या तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
————————————————————–
प्र. 7. सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) : (गुण 8)
1) शेतीचे विविध प्रकार सांगून कोणतेही दोन प्रकार स्पष्ट करा.
शेतीचे विविध प्रकार: जगात हवामान, भूरचना आणि मृदेतील विविधतेमुळे शेतीचे खालील प्रमुख प्रकार आढळतात:
खालील माहीतीच्या आधारे आकृती तयार करा फक्त मराठी शब्द घ्या व आकृतीचे बॅगग्राऊंड पांढरे घ्या.
शेतीचे प्रकार
a. सखोल उदरनिर्वाह शेती
b. विस्तृत व्यापारी धान्य शेती
c. मळ्याची शेती
d. मंडई बागायती शेती व उद्यान शेती
e. स्थलांतरित शेती
दोन प्रकारांचे स्पष्टीकरण:
I). सखोल उदरनिर्वाह शेती:
a) वैशिष्ट्ये: i) या शेती प्रकारात शेतजमिनीचा आकार लहान असतो आणि उपलब्ध जागेतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. ii) यात प्रामुख्याने अन्नधान्याच्या (विशेषतः तांदूळ) उत्पादनास प्राधान्य दिले जाते. iii) काही ठिकाणी शेत मालक पाळीव प्राणी जोडधंदा म्हणुन पाळतात
b) मनुष्यबळ: या शेतीत यंत्रांऐवजी मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
c) वितरण: हा प्रकार प्रामुख्याने आशिया खंडातील दाट लोकसंख्येच्या देशांत आढळतो, जसे की चीन, भारत, जपान आणि श्रीलंका.
II) विस्तृत व्यापारी धान्य शेती:
a) वैशिष्ट्ये: i) या शेतीमध्ये शेताचा आकार खूप मोठा (शेकडो हेक्टर) असतो. ii) नफा मिळवणे हा मुख्य व्यापारी उद्देश असल्याने येथे प्रामुख्याने गहू आणि मका यांसारखी नगदी पिके घेतली जातात.
b) यांत्रिकीकरण: पेरणीपासून ते कापणीपर्यंतची सर्व कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली जातात, ज्यामुळे येथे दरडोई उत्पादन जास्त असते.
c) वितरण: ही शेती समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात केली जाते, उदा. स्टेप्स (युरेशिया), प्रेअरी (उत्तर अमेरिका), पंपाज (दक्षिण अमेरिका) आणि डाऊन्स (ऑस्ट्रेलिया).
————————————————————–
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
————————————————————–
2) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत स्पष्ट करा.
प्रस्तावना: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा प्रदेशाच्या आर्थिक विकासाचा आणि लोकसंख्या वाढीचा काळानुरूप संबंध स्पष्ट करतो. या सिद्धांतानुसार, प्रत्येक देश विकासाच्या टप्प्यांनुसार जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचे पाच विविध टप्पे अनभवत असतो.
लोकसंख्या संक्रमणाचे पाच टप्पे:
i) पहिला टप्पा – अतिशय स्थिर (High Stationary):
या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अधिक असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर किंवा अत्यंत कमी असते. विज्ञानाचा विकास कमी असल्याने आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे मृत्यूदर जास्त असतो. सध्या कोणताही देश या टप्प्यात नाही.
ii) दुसरा टप्पा – आरंभीच्या काळात विस्तारणारा (Early Expanding):
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्य सुविधा वाढतात आणि मृत्यूदरात घट होऊ लागते, परंतु जन्मदर स्थिर राहतो. यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते, ज्याला ‘लोकसंख्या विस्फोट’ म्हणतात. उदा. कांगो, बांगलादेश, युगांडा.
iii) तिसरा टप्पा – नंतरच्या काळात विस्तारणारा (Late Expanding):
या टप्प्यात मृत्यूदर अधिक कमी होतो आणि लोकांचे राहणीमान उंचावल्याने जन्मदरही कमी होऊ लागतो. लोकसंख्या वाढत असली तरी वाढीचा दर मंदावतो. विकसनशील देशांचा यात समावेश होतो.
iv) चौथा टप्पा – कमी बदल दर्शविणारा (Low Stationary):
येथे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप कमी असतात, त्यामुळे लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते. या टप्प्यातील नागरिक आरोग्याबाबत जागरूक असतात आणि देशाची आर्थिक स्थिती उत्तम असते. उदा. अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
v) पाचवा टप्पा – ऋणात्मक वाढीचा टप्पा (Declining):
या टप्प्यात जन्मदर मृत्यूदराशी समान होतो किंवा त्यापेक्षाही कमी होतो, ज्यामुळे लोकसंख्येत घट होऊ लागते. येथे बालकांची संख्या कमी आणि वृद्धांची संख्या अधिक असते. उदा. स्वीडन, फिनलंड.
निष्कर्ष: हा सिद्धांत हे स्पष्ट करतो की, जसा देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होतो, तसा तो उच्च जन्म व मृत्यूदराकडून कमी जन्म व मृत्यूदराच्या स्थितीकडे प्रवास करतो.
————————————————————–
HSC July 26 Geo Question paper and Ans
HSC बोर्ड जुलै 2026 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
येथे डाऊनलोड करा
Question Paper Download Here
वरील उत्तरपत्रिकेत अपेक्षीत उत्तरे देण्यात आली असली तरी, ही उत्तरपत्रिका केवळ एक शैक्षणिक साहीत्य आहे. त्यात काही चुक अथवा तृंटी असल्यास बोर्डा कडून प्रदर्शीत करण्यात आलेली ऊत्तरपत्रिका अंतिम असेल.
अधिक वाचा –
HSC March 2026 Geography Question Paper and Answers
HSC 2021 Geography Question Paper and Answers
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी
बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल
बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल साठी संपर्क करा
प्रा मनोज देशमुख 9607371951